मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना त्यांचा समावेश थेट कॅबिनेट मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांना कोणतं खात देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती तटकरे या देखील पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या असून त्यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांना राज्य मंत्रिपद देण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे या युवा आमदारांना मंत्रिपदाची संधी दिल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा गट नाराज होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे. अचानक पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. अखेर पक्षातील त्यांची ताकद लक्षात घेता त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.