मुंबई प्रतिनिधी। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक ठेवी १० कोटी ३६ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची संपत्ती प्रथमच जाहीर झाली आहे. प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे अत्यंत आलिशान गाड्यांपैकी एक बीएमडब्ल्यू गाडी आहे. या गाडीची एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हे ही यावेळी उपस्थित होते. ‘मी केवळ वरळी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन. मी जिंकणार असा मला विश्वास आहे, कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत,’ असं आदित्य अर्ज भरल्यानंतर म्हणाले.