हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून आज या यात्रेचा पाचवा दिवस आहे. आज भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवत राहुल गांधी याना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ठाकरे – गांधी साथ साथ है असा थेट संदेश त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे.
भारत जोडो यात्रा आज नांदेडमधून हिंगोलीत पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली. ठाकरे घराण्यातील कोण भारत जोडो यात्रेत सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष्य होत. उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने त्यांना या यात्रेत सहभागी होता आलं नाही. मात्र त्यांचे सुपुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी यावेळी हजेरी लावल्याने शिवसेनेचा थेट पाठिंबा काँग्रेसला मिळाला आहे. भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारीही सामिल झाले आहेत.
दरम्यान, कालच राष्ट्रवादी काँग्रेसनेही भारत जोडो यात्रेला आपलं समर्थन दिले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग नोंदवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रकृतीच्या कारणाने भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत. पण राहुल गांधी यांच्याशी त्यांचं फोनवरून बोलणं झालं. आधी राष्टवादी काँग्रेस आणि आता शिवसेनेने भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यामुळे महाविकास आघाडी एकत्र आहे हे चित्र महाराष्ट्राला दिसले.