हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे – फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. “राज्यात काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्योग गुजरातमध्ये गेले, त्यावरून काही बोलायचंच नाही. घटनाबाह्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या असलेले घटनाबाह्य सरकार आणि ते चालवणारे मुख्यमंत्री यांच्यामुळे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी 10 मिनीटं चर्चा करावी.
मुळात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत माहित होतं का?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आम्ही ब्लेम गेम करत नसून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, ती दुसरीकडे पाठवण्यात आली, याचा पुरावा मिळाल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळालेले पत्र वाचून दाखवले.