हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली याबाबत राजकीय चर्चा चांगल्या रंगल्या. कालांतराने आता आदित्य ठाकरे यांनी शिवसेना फुटीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील,” असे ठाकरेंनी म्हंटले आहे.
आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेतून गेलेल्या आमदारांना आमचे समजत होतो. गेल्या 40 ते 50 वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेल नगरविकास खातं, आम्ही शिंदेंना देऊ केलं होतं. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील. आम्ही कधी सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती.
यावेळी ठाकरेंनी भाजपबाबत महत्वाचे विधान केले. “भाजपा अडीच आणि शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती करण्यावर सहमती झालेली. मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे,” असे ठाकरेंनी म्हटलं आहे.