5 एकर शेत अन् 75 दिवस..शेतकऱ्याने कमावले तब्बल 13 लाख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील शेतकरी सागर पवार याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सागरने अवघ्या 75 दिवसात 5 एकर शेतीतून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या तरुण शेतकऱ्याची सर्वत्र वाहवा होते आहे.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी असलेल्या सागरने बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण घेतले आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची त्याला खूप आवड आहे. त्यासाठी तो आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतो. आपल्याकडे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे याची त्याला जाणीव होती. याद्वारेच कापूस, भाजीपाला, कांदा अशी विविध पिके घेतली जात होती. मात्र, शेतीसाठी होणार खर्च आणि शेतीतून मिळणारा नफा यांची सांगड घालणे अवघड जात असल्याने सागरने अनेक पर्यायी पिके घेण्याचा विचार केला.

सागरने आपल्या शेतात कलिंगडाची लागवड करण्याचा निर्णय घेत 5 एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन केले. यानंतर प्रत्येकी दीड फूट अंतरावर कलिंगडाची सुमारे 5 हजार रोपे लावली. यानंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खत देण्यात आले. अशा प्रकारे रोपांची जोपासना करत फक्त अवघ्या पंच्याहत्तर दिवसातच कलिंगडाची चांगली फळे त्याला मिळाली. या कलिंगडांची बाजारात विक्री करून सागरने तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.

मात्र, स्थानिक बाजारपेठेत कलिंगडे विकण्याऐवजी त्याने दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून देशातील विविध बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले. आपले योग्य नियोजन आणि मिळालेले मार्गदर्शन यामुळे सागरने यावर्षी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

अशा प्रकारे घेतले उत्पादन
सात ते नऊ जानेवारीदरम्यान सागरने कलिंगडाची रोपे लावली. यांत्रिक पद्धतीने प्रत्येकी सात फूट अंतरावर या रोपांची लागवड करण्यात आली. तीन ते चार टन कोंबडीखत पिकांसाठी वापरण्यात आले. त्यासोबतच प्रति एकरी मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करत सुमारे आठ हजार रोपांची लागवड केली. या पेपरमुळे पाण्याची बचत होण्यास मदत झाली. कलिंगडासारख्या वेलवर्गीय पिकांवर व्हायरस तुडतुडे, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. जो रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला.

सागरच्या या कलिंगडांना मुंबई दिल्लीसह गुजरातमधील व्यापाऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. “शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून अनेक नवनवीन प्रयोग केल्यास यश नक्कीच मिळते,” अशी प्रतिक्रिया सागरने यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment