हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार व परब यांच्यावर निशाणा साधला. “मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही. आणि एसटीचे विलीनीकरण केल्याशिवाय मेस्मा अंतर्गत कारवाई करता येत नाही, असे सदावर्ते म्हणाले.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांची बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या इशाऱ्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन माध्यमांशी संवाद साधत परब यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे. सरकार पराभूत मानसिकतेत आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत. माणसे पदवी घेतात पण त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे हा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे. जो पर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोवर मेस्मा लागत नाही. परिवहनमंत्री अनिल परब तुमच्या वक्तव्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. त्यासाठी मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. अत्यावश्यक सेवा कायदा 2017 जो आहे त्यात मेस्मा लागतो. मेस्मा लावायचा का याबाबत शासन गंभीरपणे विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत नाही. पण आम्हाला जनतेचाही विचार करावा लागेल, असे परब यांनी सांगितल्याने आज कामगारांवर कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.