सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आसताना आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ येथेही असाच प्रकार समोर आला आहे. केंजळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याच्या कारणावरून पोलीस महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावरून सुरूर फाटा येथून काही अतंरावर वाई- महाबळेश्वर रस्त्याला केंजळ हे गाव आहे. या गावात आज शनिवारी दि. 12 रोजी छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने वादंग निर्माण झाला. शिवाजी महाराजाचा पुतळा बसविण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
केंजळ येथे विनापरवाना पुतळा बसविल्याची माहिती मिळताच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भैरवनाथ मंदिर व ग्रामपंचायत परिसरात हा पुतळा बसविण्यात आला आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासन दाखल झाले आहे. पोलिस प्रशासन केंजळ गावात आल्याने तणावाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत.