हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात आक्रम पवित्रा घेत भाजप नेत्यांकडून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून “मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर मुंबईत राऊत यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेविकेच्या वतीने तक्रारही दाखल करण्यात आली आहे. भाजपने तक्रार दाखल केल्यानंतर व तसेच राऊतांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने यावर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत केलेल्या वक्तव्याबाबत भूमिका मांडली आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, हे अशिक्षित अडाणी लोक आहेत. ते हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात. पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश उघडले, पाहिले, चाळले तर मी वापरलेला शब्द असंसदीय नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत, असे म्हणत राऊत यांनी टोला लगावला आहे.
मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण येथील ती बोलीभाषा आहे. त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच आहे. कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात. माझी काही अडचण नाही. पण त्यांनी शब्दकोश चाळावेत. नसतील तर त्यांना शब्दकोश पाठवून देईन, असा टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.