हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक महिना झाला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत, यासाठी मुख्यमंत्री शिंदेनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपावल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शिंदे – फडणवीसांवर निशाणा साधला. “तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं, पण बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायचं नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे. तुम्ही तुम्ही लोकशाहीची हत्या केली, लोकशाहीचा मुडदा पाडला,” अशी टीका पवारांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ हा संवाद मेळावा पार पडला. यावेळी पवार म्हणाले, ‘मावळमध्ये 2 तारखेला लहान मुलीवर अत्याचार झाला असून आरोपींना अटक केली आहे. सदर प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. मी माहिती घेतली आहे. मी पीडित मुलीच्या घरी जाणार आहे. नराधमाला 8 दिवसांच्या आत फाशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हे सर्व घडताना सरकारमधलं लक्ष घालायला कोणी नाही’.
यावेळी शिंदे – फडणवीस याच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं. पण बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायचं नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे. आता लोकांमधून मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ द्या. लोक आता गप्प आहे, संधी मिळाल्यानंतर कुठलं बटण दाबतील कळणार नाही. जनता कोणालाही उलथून टाकू शकते, असा इशारा पवारांनी दिला.