हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. तर इकडे मविआकडून विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर अधिवेशनात पवार यांनी रोखठोक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला. त्यानंतर शिवसेना फोडणारा एकही आमदार निवडून आला नाही, शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे कधीही निवडून आलेले नाहीत, असा इतिहास आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
विधिमंडळाच्या अधिवेशनवेळी सुरुवातीला अजित पवार यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धती बाबत मत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माता आलेलं नाही, असे पवार म्हणाले.
यावेळी शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधत पवार म्हणाले की, गेल्या 8-10 दिवसांत राज्यात इतके काही भलतेच घडले कि 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवून शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपलं पद सोडाव लागलं.
पटोले साहेबांच्या राजीनाम्यानंतर प्रत्येक अधिवेशनात आम्ही शिदे यांच्या सोबत राज्यपालांना भेटायला गेलो. अध्यक्ष निवडीसाठी मागणी केली. पण मागच्या चार दिवसात एवढ्या खूप वेगाने घटना घडल्या कि त्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका उपस्थित होत आहेत, असे पवार यांनी म्हंटले.
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओक्के…: अजित पवार
यावेळी अजित पवारांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांचा प्रवासच भर सभेत सांगितला. तसेच टोलाही लगावला. ते म्हणाले की, विधानपरिषदेच्या निकालानंतर बंडखोरी करून व्हाया सुरत गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना बारा तेरा दिवसात आमदार हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल तेवढं फिरायला मिळालं आहे. यावेळी अजित पवारांनी शाहजी बापू यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओक्के अस म्हणत हशा पिकवला. मात्र, ही मोठी लोकं कधी एकत्र येतील कळणार नाही, असा सल्ला भाजपचं नाव न घेता पवारांनी दिला.