मराठा आंदोलन अजित पवारांवर पडलं भारी! अखेर बारामती दौरा करावा लागला रद्द

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकिय पुढाऱ्यांचे गावात जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे. याचा सामना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील करावा लागला आहे. आज अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीला जाणार होते. मात्र माळेगावात पुढाऱ्यांना गावबंदी केल्यामुळे अजित पवारांना बारामतीचा दौरा रद्द करावा लागला आहे.

शनिवारी अजित पवार माळेगाव येथील सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची मोळी टाकून सुरुवात करण्यासाठी बारामतीला येणार होते. परंतु त्यांच्या या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रचंड विरोध करण्यात आला. तसेच, “माळेगाव कारखान्यापर्यंत अजित पवारांना जाऊ दिलं जाणार नाही” असा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनात शंका असल्यामुळे ते अजून देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत.

दरम्यान, साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार हे आज बारामती ला येणार असल्याची माहिती मराठा कार्यकर्त्यांना मिळतात त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन ठिय्या आंदोलन केले. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. यापूर्वी, अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, असे पत्र बारामतीतील कार्यकर्त्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. अखेर आज अजित पवार बारामतीत येणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या बाहेर आंदोलन पुकारले. यामुळे अजित पवारांनी कारखान्याच्या कार्यक्रमासाठी येणे रद्द केले.

आरक्षण द्या मग गावात या..

सध्या मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी राज्यभरातील मराठा बांधवांनी केली आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसल्यामुळे अनेक गावात पुढाऱ्यांची प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांनी गावात येऊ नये अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.