हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केले, असा आरोप केला होता. त्याच्या आरोपावर आता पवारांनीही उत्तर दिले आहे.” आपण एखाद्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगले पाहिजे. त्यांनी एकदा आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही’, असा टोला पवार यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवक पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकात पाटील यांचा पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी काही तरी पुरावे द्यावेत. मी सकाळी लवकर उठून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. मंत्रालयात सकाळी 8 वाजता हजर असणारा मी एकमेव मंत्री आहे आणि उशिरापर्यंत बसून मी तिथे माझ्यापरीनं काम करत असतो. ते काम योग्य की अयोग्य हे जनता त्याठिकाणी ठरवेल.
मात्र, आपण काय बोलतो याचे भान बाळगणे गरजेचे आहे. हेलिकॉप्टरमधून जाताना कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते, कितीजण जाणार याची माहिती द्यावी लागते. ते मोठी व्यक्ती आहेत. पण उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून चालत नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एकदा आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे, की आपण काय बोलतो आणि ते वस्तुस्थितीला धरुन आहे का? असा सवाल पवार यांनी यावेळी विचारला.