विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडणार, पण तो…; अजित पवारांचे महत्वाचे विधान

ajit pawar
ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकी प्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपसह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली आहे. या निवडणुकीत आपणच जिंकणार असे दावेही त्यांच्याकडून केले जात आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीतील विजयाबाबत महत्वाचे विधान केले. या निवडणुकीत नक्कीच चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधा. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यावेत म्हणून प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या सर्व आमदारांकडून मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

आम्ही एकत्रित बैठक घेणार असून सर्व आमदारांना मतदान कसं करायचं त्या संबंधी सर्व मार्गदर्शन करणार आहे. आमच्या दोन आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. त्यामुळे अपक्षांच्या मदतीने हे कसे भरुन काढायचे हे पाहिले. आमचे सर्व आमदार हे बहुजन विकास आघाडीला जावून भेटले आहेत. त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी आम्हीही प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी म्हंटले.