माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव खराब होत असेल तर मी राजकारण सोडणंच चांगलं – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । प्रफुल्ल पाटील

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. “सहकारी संस्थांसाठी इतकं काम केलं तरी आपल्यावर आरोप झाले. मागील काही काळात काकांना नाहक त्रास दिला गेला आहे. आपल्यामुळे पवार साहेबांच्या नावावर डाग लागत असेल तर आपण थांबलेलं बरं” असा विचार अजित पवार यांनी केला असल्याचं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं.

राजीनामा दिल्यानंतर आपलं आणि अजित पवारांचं बोलणं झालं नसल्याचंही पवार पुढे म्हणाले. अजित पवार यांचा राजीनामा आणि ईडी चौकशी यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं त्यांनी यावेळी दिली. ईडीकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. आपण आता राजकारण थांबविण्याचा विचार करत असून शेतीकडे लक्ष देण्याचा विचार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितल्याचं सूत्रांकडून कळालं आहे. पक्षातील अधिकांश नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. अजित पवारसुद्धा असंच काही करतील का या शक्यतांना उधाण आलेलं असताना आपण राष्ट्रवादीचेच राहणार असल्याचंही अजित दादा म्हणाले. दरम्यान ईडीच्या चौकशीत शरद पवारांचं नाव असल्याच्या अफवा आता संपल्या असून ईडीकडूनच पवार यांचं प्रकरणात पुढेही नाव येण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं गेलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हेवाडी, किरकटवाडी येथील पूरग्रस्तांना भेट दिली. आपल्या राजकीय अस्तित्वाविषयी चिंता करण्याचं काहीही कारण नसून आपण अद्यापही खंबीर असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. 

दरम्यान अजित पवार यांच्या मुलांनी आपण व्यवसायात लक्ष घालू अशी विनंती केल्याचंही शरद पवार म्हणाले. आपल्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वाद नसून केवळ प्रसिद्धीसाठी पवार कुटुंबीयांची प्रतिमा मलीन करण्याचा उद्योग सुरु असल्याचं पवारांनी सांगितलं. आयुष्यात एकदाही निवडणूक न लढवलेल्या प्रदेशाध्यक्ष लोकांविषयी आपण काय बोलणार असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. उदयनराजेंच्या मानसिक परिस्थितीविषयी बोलून त्यांच्या अडचणीत आपण भर घालू इच्छित नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.