नाशिक । राज्याचे पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्थेचे एकमेव रक्षक असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्या जबाबदारीमध्ये माणुसकीतील जबाबदारी सुद्धा जबाबदारी असते. पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमान, कायद्यानं वागावे. परंतु, कायदा पळताना, तुमच्यातील माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू देऊ नये. तुम्ही घातलेल्या खाकी गर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टार्सना किंमत आहे. असा मंत्र महाराष्ट्र पोलीस अकादमितील दिक्षांत संचलन समारंभाच्या प्रसंगी उपमुख्यमत्री अजित पवार यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना दिला.
118 व्या सत्राच्या प्रसंगी दुरदृश्य प्रणालीद्वारे या प्रशिक्षण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मला आनंद आहे की, आपल्यापैकी अनेक जण शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग कुटुंबातील, सामन्य कुटुंबातून आले आहेत. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या अडचणी, दुःख काय असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रोज कष्ट करून रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या वेळेचं, श्रामचं मोल तुम्ही समजलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव तुमच्याकडे असेल तरच, पोलिस स्टेशन मध्ये मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला तुम्ही न्याय देऊ शकाल. तुम्ही पोलिसांचे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरणार आहात. समाजातील सामान्य माणसाशी तुमचा संबंध येणार आहे. या सामान्य माणसाशी तुम्ही कशे बोलतात, वागत, त्यांच्या प्रश्नांकडे कसे बघता, ते कसे सोडवता, यावर तुमची, तुमच्या वर्दीची, त्यावरील स्टार्सची आणि शासनाची प्रतिमा तयार होत असते.”
या समारंभाच्या संचलनावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुरदृश्य प्रणालीद्वारे तर पोलीस महासंचालक( प्रशिक्षण व खास पथके) संजयकुमार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.