हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे गट, भाजप, ठाकरे गट यांच्याकडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीही मागे नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी थेट मनसे नेते वसंत मोरे यांनाच खुली ऑफर दिली आहे.
पुण्यातील मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर त्यांना दिली आहे. एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी “तात्या कधी येता… वाट पाहतोय,” असे म्हंटले. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनी देखील दुजोरा दिला आहे.
सध्या अपुन्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून पक्ष बळकटीकरण करणे, इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. त्याचीही प्रचिती कालच्या विवाहसोहळ्यात आली. आता पवारांनी मनसेच्या वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यानं मनसेचं टेन्शन चांगलचं वाढलं आहे.