हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीदरम्यान प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले प्रशांत किशोर यांनी स्वतः सांगितलं मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नाही आहे. तसंच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार असं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान , शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास भेट झाली. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली.पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.