मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार मुंबईवरून पुण्याकडे निघाले आणि अजित पवार राजीनामा सादर करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांच्याकडे गेले त्यामुळे देखील चर्चा सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादीत अजित पवार यांना मानणारा वेगळा वर्ग आहे. त्या गटाच्या कुचंबणेचे राजकारण सध्या सुरु आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणावर अजित पवार नाराज असल्यानेच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिव स्वराज्य यात्रे पासून जाणीवपूर्वक अजित पवारांना बाजूला ठेवले. पवारांच्या तिसऱ्या [पिढीत रोहित पवारांना शरद पवारांनी जवळ केले. तर पार्थ पवारांना दूर लोटले अशी काही कारणे अजित पवारांना नाराज करत आहेत. त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला आहे असे बोलले जाते आहे.
मागील काही दिवसात अजित पवारांवर राज्य सहकारी बँकेच्या व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातच सुप्त संघर्ष असल्याचे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलू लागले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा का दिला याचे गूढ अद्याप तरी उकलत नाही.