औरंगाबाद । राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. अजित पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय. शिवाय उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय.
कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.