हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर टीका केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री व्हायचेच होते तर एकनाथ शिंदे यांनी मला कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मुख्यमंत्री केले असते ना. इतका खटाटोप करायची काय गरज होती, असा टोला शिंदे यांना लगावला. तर आता जे आमदार बाकं वाजवत आहे त्यांनी वाजवण्यापेक्षा मंत्रीपदे मिळतात का ते पहावे, अशी टीका पवार यांनी केली.
कोरोनातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रथम त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना टोलेही लगावले. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. आजपर्यंत आम्ही नार्वेकरांचा जावई हट्ट पुरवला आता त्यांनी आमचा हट्ट पुरवावा.
तसेच शिंदे याच्यावर निशाणा साधत पवार म्हणाले की, फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितले असते तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केले असते, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.