हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद होत आहेत. त्यातच जीएसटीच्या परताव्यावरून देखील अनेक वेळा राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल आणि डिझेलवर लागू करण्यात येणाऱ्या करांचा मुद्दा देखील चर्चेत येण्याची शक्यता असताना त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणावे आणि एकच कर लावावा अशी चर्चा आहे. पण राज्याला कर लावण्याचे जे अधिकार आहेत ते कायम रहावेत, ते काढून घेऊ नयेत असे अजित पवार यांनी म्हंटल. केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याचे अधिकार राज्याला द्यावेत, असंही अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, बैठक दिल्लीला घ्या अशी विनंती आम्ही केली होती, पण केंद्रानं बैठक लखनौलाच ठेवली आहे, असं देखील अजित पवार म्हणाले. आम्ही त्यांना विनंती करत होतो की दिल्लीतच ठेवा. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही त्यांना म्हटलं, अनेक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर होतात. तशी ही बैठक देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर करता येऊ शकेल. पण त्यांनी अजून त्याबद्दल परवानगी दिलेली नाही”, असं अजित पवार यांनी नमूद केलं आहे