टीम हॅलो महाराष्ट्र | अजित अनंतराव पवार. मागील २५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून अस्तित्व सिद्ध केलेलं नाव. काकांच्या आशीर्वादाने अजित पवारांची राजकारणातील वाटचाल सोपी झाली असली तरी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा वाटाही यात तितकाच महत्वाचा राहिला आहे. उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्षनेता अशी विविध खाती सांभाळण्याचा १५ वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेल्या अजित पवारांची प्रशासनावरील पकड ही मजबूत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काम करुन घेण्यात अजित पवार वाकबगार आहेत. याशिवाय तळागळातील लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्यामध्ये स्वतःचं विश्वासार्ह स्थानही अजित दादांनी निर्माण केलंय.
एखाद्या व्यक्तीने पवार घराण्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला नेस्तनाबूत करण्याची कलाही अजित पवारांनी अंगी बानवली आहे. विरोधी पक्षांतही दिलदार मित्र जमवण्याचा अजित पवारांचा गुणधर्म उल्लेखनीय आहे. सिंचन घोटाळ्यात नाव आल्याने अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला फटका बसतो की काय अशी परिस्थिती मागील ५ वर्षांत अनेकदा समोर आली होती. हे प्रकरण निस्तारलं जावं म्हणून अगदी पहाटे शपथविधीही उरकण्यात आला होता. पण चुकांच्या पांघरूनाखालीही अनुभवांची शिदोरी लपवलेल्या अजित पवारांनी यावर तोडगा काढून राज्याच्या राजकारणातील आपलं स्थान अबाधित ठेवलं. मुलगा पार्थला राजकारणात प्रोजेक्ट करण्यासाठी अजित पवार घेत असलेले कष्ट लपून राहिले नाहीत. याशिवाय मागील काही काळात कुटुंबामध्ये असलेल्या कलहाच्या वातावरणातूनही दादा सुखरुप बाहेर पडले आहेत.
सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला आहे. शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यात आणि सुप्रिया सुळेंमध्ये स्पर्धा असली तरी अजित पवार ते दाखवून देत नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली आहे. दारूबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, आधुनिक शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांना प्रोत्साहन, नगर-विकास, पंचायत राज व्यवस्थेत सर्व घटकांना सामावून घेणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाची मांडणी करणं या सगळ्यांत अजित पवारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे.
सध्या राज्यात कोरोनाचं संकट असताना अजित पवारांनी पायाला भिंगरी लावून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उद्धव ठाकरेंना शह देऊन ते मुख्यमंत्री बनतील अशा कंड्याही पिकवल्या जात आहेत. पण हे सगळं फक्त सोशल मीडिया विद्यापीठातील चर्चेपुरतच..!! एवढं असलं तरी राज्याच्या मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना कायम हुलकावणीच दिली आहे. तगडी खाती पदरात पाडून घेताना राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षं उपमुख्यमंत्रीपदच आपल्या वाट्याला घेतलं. सध्याच्या सत्ता-संघर्षात राष्ट्रवादीने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवलीय एवढं मात्र नक्की – त्यामुळं भविष्यात पर्मनंट उपमुख्यमंत्रीपदाचा टॅग – मुख्यमंत्री अजित पवार असा दिसून आला तर नवल वाटायला नको. तूर्तास सरकारमधील घटकपक्षांमध्ये समन्वय साधून परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य जिकिरीने निभावणाऱ्या अजित पवार उर्फ दादा यांना वयाच्या एकसष्ठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!