मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, जीएसटीची पुढील रक्कम प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळावी,आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय तूटीची मर्यादा ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना या पत्रात केली आहे. याचसोबत राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील ५ महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा १० हजार कोटींचे असं एकूण ५० कोटींचे अनुदान दिले जावे अशी प्रमुख मागणी अजित पवार यांनी मोदींना केली आहे.
राज्याच्या औद्योगिक, व्यापारी, आर्थिक क्षमतेबद्दल पंतप्रधानांना विश्वास दिला आहे. करोना संकटावर मात करण्याची महाराष्ट्राची ताकद असल्याचे अजित पवार यांनी मोदींना या पत्रातून स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने २४ मार्चपासून ३ मेपर्यंत जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यांची अर्थव्यवस्था ठप्प आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात २७ हजार कोटींची घट आहे. लॉकडाउन सुरुच असल्याने पुढचे काही महिने अर्थव्यवस्था खाली जाण्याची भीती आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ठरलेल्या सूत्रांप्रमाणे देय अनुदान तात्काळ द्यावे, यात विलंब करु नये, अशी विनंतीवजा मागणी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”