हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वाचेच लक्ष पुणे जिल्ह्याच्या निकालाकडे लागले आहे. पक्ष फुटीनंतर पुण्यात अजित पवार की शरद पवार गट बाजी मारेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या बारामती तालुक्यांत 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरूवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा बारामतीमधील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आमने सामने लढत होती. मात्र, शरद पवार गटाला टक्कर देत भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवारांकडे आली आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गट आणि शरद पवार गट ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे दोन्ही गट कोण कोणत्या ग्रामपंचायतीत विजय मिळवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार, म्हसोबानगर, पवईमाळ, पानसरे वाडी, आंबेवाडी आणि भोंडवे वाडी या पाच ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळवलं आहे. यासोबत, करंजे, भैरवनाथ, जराडवाडी ग्रामपंचायती अजित पवार यांच्या गटाला यश आले आहे. त्यामुळे, अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला, या निकालांमुळेशरद पवारांच्या हाती निराशा आल्याचे दिसत आहे.