हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल चांगलाच राजकीय भूकंप झाला. बिहारचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपबाबत त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी कौतुक केले आहे. ‘शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागते. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा…तो योग्यच आहे. 100 वर्ष शेळी होण्यापेक्षा एक दिवसाचा सिंह बरा, असे दानवे यांनी म्हंटले आहे.
अंबादास दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत बिहारच्या राजकीय हालचालींबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी दानवे म्हणाले, भाजपाच्या दबावापुढे न झुकता एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी घेतला. त्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वाभिमानाचा आहे. भाजपाच्या या दमननीतीचा एक दिवस भारतात विस्फोट होईल हे नक्की.
आ. दानवे यांनी काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. काल अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यातून सत्तार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याचंच स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची शक्ती जास्त की अब्दुल सत्तार यांची? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे दानवे यांनी म्हंटले.