वॉशिंग्टन । अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेने 30 ऑगस्टच्या मध्यरात्री अफगाणिस्तान सोडले. आता अमेरिका तालिबानच्याच मदतीने ISIS-K वर एयरस्ट्राइक करेल. अमेरिकेचे लष्कर जनरल मार्क मिल्ली यांनी म्हटले आहे की,” तालिबान ही क्रूर संघटना आहे. ते बदलेल की नाही याबद्दल आत्ता काहीच सांगता येणार नाही.” जनरल मार्क मिल्ली म्हणाले की,”तालिबानसोबत भविष्यातील सहकार्याबद्दल कोणीही अंदाज लावू शकत नाही, पण आमचे लक्ष ISIS-K वर राहील.”
या दरम्यान, मिल्लीने अमेरिकेने तालिबान्यांशी आतापर्यन्त केलेल्या डीलिंग्सबद्दल सांगितले की,”अशा प्रसंगी तुम्ही तुमचे मिशन आणि सैन्यावरील धोका कमी करण्यासाठी आवश्यक ते करता.” जनरल मार्क मिल्ली म्हणाले की,”अमेरिका अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या इस्लामिक दहशतवाद्यांविरोधात एयरस्ट्राइक करू शकते, भविष्यात तालिबानला सहकार्य करूनही हे केले जाऊ शकते.”
खरं तर, काबूल विमानतळावर हल्ला झाल्यापासून, ISIS-खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने लक्ष्य केले आहे. काबूल विमानतळावर झालेल्या फिदाईन हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K ने घेतली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी हल्लेखोरांना शोधून ठार मारण्याचा इशारा दिला. याच्या 36 तासांच्या आत अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात ड्रोन हल्ल्यात ISIS-K च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
ISIS-K म्हणजे काय ?
ISIS-K चे नाव ईशान्य इराण, दक्षिण तुर्कमेनिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तान मध्ये येणाऱ्या प्रदेशावरून पडले आहे. ही संघटना 2014 मध्ये पूर्व अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदा सक्रिय झाली. येथून निर्दयीपणा आणि क्रौर्याची छाप पाडली.
ISIS-K सुरुवात कुठे झाली ?
पाकिस्तानातील शेकडो तालिबानी या संघटनेशी संबंधित होते आणि त्यांनी अनेक अतिरेकी हल्ले केले. जेव्हा त्यांना सैन्याच्या मदतीने बाहेर काढण्यात आले, तेव्हा ते अफगाणिस्तानच्या सीमेवर आले आणि नंतर येथून ऑपरेट करण्यास सुरुवात केली. शक्ती यामुळे वाढली कारण तालिबान पाश्चिमात्य देशांबद्दल आणि विचारांप्रती मवाळ झाले. अशा परिस्थितीत असंतुष्ट तालिबानी ISIS-K कडे जाऊ लागले.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या मते, ISIS-K मध्ये सीरिया आणि इतर विदेशी अतिरेकी संघटनांमधील काही दहशतवाद्यांचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की,”अमेरिकेने अफगाणिस्तानात या गटाचे 10 ते 15 मोठे दहशतवादी ओळखले आहेत. ISIS-K मध्ये पाकिस्तानी आणि उझबेकिस्तानमधील दहशतवाद्यांचा अफगाणांसह इतर दहशतवादी गटांचा समावेश आहे.”