हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 4 ते 9 नोव्हेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. मात्र यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेली अनेक वर्षे केसरी कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांभाळले आहे. मात्र यावर्षी त्यांना डावलून प्रमुख पाहुण्यांचा मान अमित शहा यांना देण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वाद होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
यावर्षी शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात न आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्य म्हणजे या वर्षी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आले आहे. तर शरद पवार यांना या स्पर्धेसाठी आमंत्रण देण्यात आलेले नाही. ज्यामुळे शरद पवार गटाने भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, शरद पवार हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आजवर या संघटनेमध्ये अनेक चांगले बदल करण्यात आले आहेत तसेच नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, भाजपने यामध्ये देखील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अशी वेगळी संघटना स्थापन केली आहे. ज्याचे अध्यक्ष भाजपचे रामदास तडस आहेत. याच संघातर्फे घेण्यात येणारी 66 वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा 4 ते 9 नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ज्यामुळे या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना बोलावण्यात आलेले नाही.