हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकी ची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.या निवडणुकीत भाजप-जेडीयू यांची युती विरुद्ध आरजेडी-काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने बिहार निवडणुकीत उडी मारली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या एनडीएला पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने सत्ताबदलासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुक रंगतदार होणार हे नक्की. त्यातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकी बाबत भाष्य करत जागांबाबत दावा केला आहे.
‘न्यूज18’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, ‘आम्ही आधीच ठरवलं आहे की ही निवडणूक नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल. निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. जेडीयूपेक्षा भाजपने अधिक जागा जिंकल्या तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. काही वचनं की सार्वजनिकरित्या दिली जातात आणि त्यांचं पालन केलं जातं.’
भाजपला किती जागा मिळतील?
‘एनडीएची स्थापना झाल्यापासून नितीश कुमार आमचे साथीदार आहेत. आघाडी धर्म आहे, केंद्रात मोदीजी आणि राज्यात नितीशजी असं डबल इंजिन सरकार बिहारच्या विकास करत आहे. निवडणुकीत आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळेल,’ असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
तसेच आम्ही चिराग यांच्यासोबत अनेकदा बोललो. मी स्वत: त्यांच्याशी संवाद साधला होता. मात्र त्यांनी अशी काही वक्तव्य केली ज्याची प्रतिक्रिया भाजप आणि जेडीयू कार्यकर्त्यांमध्ये उमटली. निवडणुकीनंतर ते सोबत येतील की नाही हे नंतर पाहू,’ असं अमित शहा म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’