मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राला आजही एक कोड पडलं आहे ते एका भल्या पहाटे घडलेल्या घटनेचं. ते म्हणजे सत्तासंघर्षात अजित पवारसोबत देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाकी घेतलेल्या धक्कादायक शपथविधीचं. मात्र, घटनेवर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. पत्रकार राजू परुळेकर यांच्या ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ या मुलाखतीत त्यांनी भल्या पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीच्या रहस्यावरून पडता हटवला आहे.
या मुलाखतीत फडणवीस म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही अर्ध्या रात्री फोन करु शकतो ते अमित शाह यांना. कारण सगळ्या गोष्टी आम्ही मोदीजींपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा खूप चांगला संपर्क आहे. त्यावेळी अमित शाह यांना काय घडलंय याची अर्ध्या रात्री कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडल्या. पहाटे अजित पवारांसोबत जो शपथविधी झाला त्याचे शिल्पकार अमित शाह हेच होते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच मागची ५ वर्षे आणि आजही आमच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतला होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जेव्हा शिवसेनेला पाठिंबा द्यायचं नक्की केलं तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आज मागे वळून पाहतो तेव्हा तो नसता घेतला असता तर चाललं असतं. मात्र त्यावेळी तो मला योग्य वाटला होता. पाठीत सगळेच खंजीर खुपसत असल्यावर राजकारणात जिवंत राहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”