…तर आजच शिंदे-फडणवीस सरकार कोसळलं असतं; खा. अमोल कोल्हे यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील अनेक नेते शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत करत आहेत. मात्र, आपण अजून खुप वर्ष राहणार असल्याचे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठे विधान केले. “हे सरकार जास्त काळ टीकणार नाही. या सरकारवर आजच निर्णय होणार होता, पण न्यायमूर्ती रजेवर गेले असल्यामुळे निर्णय झाला नाही. ते असते तर आजच शिंदे-फडणवीस सरकार कोसळलं असतं. आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार नवस करत फिरत आहेत. त्यामुळेच ते कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेलेत”, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

अमरावतीत खा. कोल्हे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज न्यायालयात निर्णय होणार होता. मात्र, तो पुढे ढकलला. न्यायालयाचा निर्णय लवकर आला तर सगळे आमदार अपात्र होतील आणि हे सरकार कोसळणार हे आम्हाला माहिती आहे. काहीही झाले तरी राज्यपालांची हकालपट्टी होणार आहे. आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार आणि सर्व पक्ष ताकदीने एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील.

न्यायालयात जर निकाल लागला तर शिंदे गटाचे सगळे आमदार डिसक्वालीफाईड होतील, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. या 40 आमदारांचा भाजपने राजकीय बळी घेतला आहे, अशी टीकाही कोल्हे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री शिंदेंचा जादूटोणा बुवाबाजीवर विश्वास

यावेळी मुख्यमंत्री शिंदे याच्यावर खा. कोल्हे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करून जनप्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जादुटोणा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात हे काही फार चांगले नाही. यासाठीच आज गाडगे बाबांच्या या भूमित येऊन हे सरकार गेलं पाहिजे आणि जनतेला अपेक्षित असलेल महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं पाहिजे एवढीच विनंती करत असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले.