हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे गणितच मांडले. “देशात मोदी लाट कायम आहे परंतु असं नाही. कालच्या पाच राज्यांव्यतिरिक्त जर माहिती घेतली तर भाजपची परिस्थिती वाईट आहे. 29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्येच भाजपचे स्पष्ट बहुमत आहे,” असे मिटकरी यांनी म्हंटले आहे.
अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजपच्या जागांबाबत बोलायचे झाले तर सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये 0 जागा आहेत. त्यांच्याकडे जागा आहेत त्या फक्त आंध्रमध्ये 175 पैकी 4, केरळमध्ये 140 पैकी 1, पंजाबमध्ये 117 पैकी 3, बंगालमध्ये 294 पैकी 3, तेलंगणात 119 पैकी 5, दिल्लीत ७० पैकी ८, ओरिसात 147 पैकी 10, नागालँडमध्ये 60 पैकी 12 जागा निवडून आल्या आहेत.
ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे. मेघालयात 60 पैकी 2, बिहारमध्ये 243 पैकी 53, जम्मू आणि काश्मीर मध्ये 87 पैकी 25 गोव्यात 40 पैकी 13 जागा निवडून आल्या आहेत. देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत. अर्थ स्पष्ट आहे भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66 टक्के जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, असे मिटकरी यांनी म्हंटले आहे.