हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असं ट्विट केलं आहे की त्यामुळे सरकारचीच झोप उडण्याची शक्यता आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व … असं मिटकरी यांनी म्हंटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमोल मिटकरी यांचे ट्विट काय ?
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विट सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये अजित पवारांचे भाषण, त्यांचे डायलॉग दाखवण्यात आले आहेत. निडर नेतृत्व, करारी व्यक्तिमत्त्व…. संघर्षयोद्धा अजितदादा असं या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. तसेच मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व असं कॅप्शन मिटकरी यांनी दिले आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाला तरी डिवचलं नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे सरकार कडून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे ठासून सांगितलं आहे परंतु विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेचा निर्णय अजून बाकी आहे. त्यामुळे जर शिंदे यांच्यासोबतचे आमदार अपात्र झाले तर भाजप अजित पवारांना शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री करणार का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे.