व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीसांचा चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीसीद्वारे दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले होते. चव्हाण यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले असून, अमृता फडणवीस यांनी आज चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. तसेच ट्विट करीत निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल. तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !, अशी एकेरी भाषेत आक्रमक प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

काल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी त्यांनी निषेध नोंदवत असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याचे नाव घेत त्यांच्यावरही निशाणा साधला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकत त्यांना नोटीस पाठवली आहे.