हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्य सरकार आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, मराठा आंदोलकांनी जाळपोळ करणे, गाड्या फोडणे, दगडफेक करणे असे प्रकार घडवून आणले आहेत. यामुळे बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यात निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती पाहता मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.
आज ठीक साडेदहा वाजता सर्व पक्षीय बैठकीला सुरुवात होईल. एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना बोलवण्यात करण्यात आले आहे. तसेच, मनसेपासून ते जनता दल आणि रासप आणि माकपलाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करतील. त्यामुळे आजची ही बैठक मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीला कोण कोण येणार?
मुख्यमंत्र्यांकडून बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शरद पवार, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, उदयनराजे भोसले, संभाजीराजे, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील या सर्वांना बोलवण्यात आले आहे. यांच्याबरोबर, “राजेश टोपे, जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, कपिल पाटील, विनय कोरे, महादेव जानकर, बच्चू कडू, राजू पाटील, रवी राणा, विनोद निकोले, प्रकाश आंबेडकर, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, गौतम सोनावणे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखाताई कुंभारे” हे सर्वजण उपस्थित राहतील.
दरम्यान, मंगळवारी रात्री देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली आहे. परंतु या बैठकीमध्ये विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्यामुळे राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचा विचार करत आहे. या संदर्भातच काल रात्री ही बैठक पार पडली आहे.