हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसार म्हंटलं कि नवरा बायकोची भांडणे हि कधी – कधी होतात. भांडणानंतर ती मिटतातही. मात्र, काही किरकोळ कारणावरून मोठं टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनाही अनेकदा आपण पहिल्या असतील. या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात आणि होत्याचं नव्हतं होवून बसतं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली. फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या नवऱ्यानं आपल्या बायकोच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटाखाली ब्लेडने ७ ते ८ वार केले. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी नवरा राहुल बाळकृष्ण येवले (वय ३५, रा. पसरणी, ता. वाई) याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल येवले व पत्नी प्रियंका (वय ३२) हे दोघेही वाईतील एका कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. घटनेच्या आदल्या दिवशी दि. ७ रोजी सायंकाळी बायकोच्या फोनवर राहुलने फोन केला. मात्र, त्याचा फोन तिने उचलला नाही. कामावरून घरी गेल्यानंतर राहुलने ‘तू कुठे होतीस, माझा फोन का उचलला नाहीस,’ असे म्हणून वाद घातला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी दि. ८ रोजी पहाटे कामावर जाताना याच कारणावरून नवरा बायकोच्यात पुन्हा वाद झाला. राहुलने कपाटावरील ब्लेड घेऊन बायको प्रियंका हिच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटाच्याखाली मारून तिला गंभीर जखमी केले. सात ते आठ वार तिच्या शरीरावर केल्याने तिला वाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीचा जबाब नोंदविल्यानंतर राहुल येवलेवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक श्रीनिवास बिराजदार हे अधिक तपास करीत आहेत.