इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे बुलढाण्यातील वातावरण पेटलं; गावबंद करून घटनेचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाणा जिल्ह्यात एका युवकाने इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे चांगलेच वातावरण पेटले आहे. याठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत गावकऱ्यांनी टायर जाळून आणि गावबंद करून युवकाला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

सदर घटना खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावात घडली आहे. येथील एका तरुणाने इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही बाब गावकऱ्यांच्या मंगळवारी लक्षात आली. यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, आपला संताप व्यक्त करत रस्त्यावर टायर जाळले. घडलेल्या या सर्व प्रकारामुळे मंगळवारी गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त राबवण्यात आला. यानंतर त्यांनी संबंधित युवकाला अटक केली.

दरम्यान, खामगाव पोलिसांनी युवकाला अटक केली असली तरी गावातील वातावरण शांत झालेले नाही. त्यामुळे बोरी अडगाव गावात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. सध्या घडलेल्या प्रकाराचा गावकऱ्यांकडून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. त्यांनी, संबधित युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी खामगाव पोलिसांकडे केली आहे.