हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारपासून राज्यातील मुंबईसह इतर भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच “नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे” आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. तर मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद केला आहे. पाऊस सुरू झाला की, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते. तसेच या रस्त्यावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सबवेवर गुडघ्या एवढे पाणी साचले आहे.
या सर्व स्थितीचा आढावा घेऊन अंधेरी सबवेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, अंधेरी पूर्व-पश्चिम भागात गोखले पूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिक विलेपार्ले इथील कॅप्टन गोरे उड्डानपूल, मिलन सबवे, तर जोगेश्वरीतील ट्रॉमा सेंटर या पर्यायी रस्त्यांचा वापर करतात. परंतु या सगळ्यात अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी सर्वात सोयीचा ठरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सबवेतून सुरु असते.
मात्र आता खबरदारी म्हणून सबवे बंद करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरीला चांगलच झोडपून काढल आहे. नागरीकांना घराच्या बाहेर जाणे मुश्किल झाले आहे. या पावसामुळे मुंबईतील शाळा देखील बंद ठेवण्यात आले आहेत. पुढील 24 तासात हा पाऊस असाच सुरू राहील अशी माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यासाठी पुढचे ३ ते ४ तास खूप महत्त्वाचे असतील असे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हवामान खात्याकडून शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.