हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून तसेच गटबाजीला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोटे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असला तरी सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. गोटे यांनी दिलेल्या राजीनामामुळे शरद पवार गटाला याचा चांगला धक्का बसला आहे. अनिल गोटे यांची एक विश्वासू नेते म्हणून ओळख होती.
अनिल गोटे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी, गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या गटबाजीमुळे घुसमट होत आहे. त्यामुळे आपण उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तू कुठे यांनी पक्षातील गटबाजीबाबत आपली वैयक्तिक नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी गोटे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून गोटे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, सध्या तरी आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही किंवा भाजपशी हात मिळवणी करणार नाही अशी स्पष्ट भूमिका देखील गोटे यांनी मांडली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. अशातच आगामी निवडणुका तोंडावर असताना शरद पवार यांच्या गटातून महत्त्वाचे नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे याचा तोटा पुढील काळात शरद पवारांना बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.