हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना परब यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. “सोमय्या जाता-जाता स्वतः पडले असतील. त्यांनी नौटंकी करू नये,” असे मंत्री परब यांनी म्हंटले आहे.
अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर काल हल्ला झाला. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत. सोमय्यांनी राजकीय नौटंकी करू नये. त्यांना फिजिकल मारहाण झाली नाही. ते जात असताना स्वतः पडले, असे परब यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावरून आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. दरम्यान, आज नाशिक येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनीही प्रत्युत्तर दिले.