संतापजनक! ऍम्ब्युलन्सने कोरोनाग्रस्त रुग्णाकडून ७ किलोमीटर साठी वसूल केले तब्बल ८ हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढते आहे आणि रुग्णालयातील बेड देखील अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना लुबाडण्याचे कामही काहीजण करत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका ऍम्ब्युलन्स ने कोरोनाग्रस्त रुग्णाला ७ किलोमीटर अंतरासाठी ८ हजार रुपये चार्ज केले. आता प्रकरणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील बिबडेवाडी मध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाने हॉस्पिटल ला जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलावली होती. रुग्णाला बिबडेवाडी पासून दीनानाथ हॉस्पिटलला जाण्यासाठी ८ हजार रुपये द्यावे लागले. हे अंतर केवळ ७ किलोमीटर इतके होते. या प्रकरणाची रुग्णाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर ऍम्ब्युलन्सच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तपासात ही ऍंब्युलन्स सेवा संजीवनी ऍम्ब्युलन्स सर्व्हिस या नावाने चालविली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र याचे लायसन्स मोबाईल क्लिनिकच्या नावावर आहे.

मोटार वाहन निरीक्षकांकडून स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ऍंब्युलन्सच्या मालकाविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना संक्रमण वेगाने वाढते आहे. राज्यातील रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार पार झाली आहे. राज्यातील १ लाख ३२ हजार ६२५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.