हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागेवाडी येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय 39) यांचे राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले. जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी ते बुधवारी (दि. 5) रोजी निघाले होते. तेव्हा वाटेतच काळाने घाला घातला.
जवान अंकुश माकर यांनी लेह-लडाख, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट देशसेवा केली. गेली 19 वर्षे 8 महिने ते कालूचक जम्मू-काश्मीर येथे बॉम्बे इंजिनिअर युनिट नंबर 106 मध्ये कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ चार महिने बाकी होते. नागेवाडी येथे 20 दिवसांपूर्वी आपल्या वडिलांचे निधन झाल्याने ते आठ दिवसांच्या सुट्टीवर येथे आलेले होते.
सुट्टीवरून जम्मूतील कालचुक या सैन्य दलाच्या मुख्यालयात आपल्या युनिटवर हजर होण्यासाठी ते रेल्वेने निघाले असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती नागेवाडीसह भाडळे पंचक्रोशीत विविध गावांमध्ये पोहचली. त्यानंतर गावोगावी जवान अंकुश माकर यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले. तत्पूर्वी पुणे येथील लष्करी मुख्यालयात त्यांच्या पार्थिवाला जवानांच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे.
दरम्यान,आज (सोमवारी) नागेवाडी येथे डिस्कळ- वाठार रस्त्यालगत बिग्याचा माळ नावाच्या शिवारात अंकुश माकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वीर जवान जवान माकर यांच्या पश्चात वृद्धा आई, पत्नी माधुरी माकर, मुलगा ओंकार (वय 12), मुलगी रोशनी (वय 6), दोन भाऊ, भावजा असा एकत्र परिवार आहे.