संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या संदर्भात मुंबईतील शिवडी न्यायालयाने निर्णय देत राऊतांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच, 28 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

तत्पूर्वी, महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश पीआय मोखाशी यांनी 10 जून रोजी मेधा सोमय्या यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली होती. यावेळी कलम 204 (A) अंतर्गत संजय राऊत यांना समन्स बजावले होते. तसेच 4 जुलै 2022 पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मेधा सोमय्या यांनी माफी न मागितल्यास शिवसेना नेत्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राऊतांनी मेधा सोमय्यांवर आरोपही केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली होती. मात्र, राऊत यांनी आपले वक्तव्य मागेही घेतले नाही किंवा माफीही मागितली नाही, त्यानंतर मेधा यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत शौचालये बांधण्यासाठी दिलेल्या निधीचा मेधा यांनी त्यांच्या ‘युवा प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना मेधा यांनी संजय राऊत यांना त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास आणि जाहीर माफी मागण्यास सांगितले. मात्र, राऊतांनी माफी न मागितल्याने मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात न्यायालयाने निर्णय दिला.

Leave a Comment