शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच जयंत पाटलांना अश्रू अनावर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे मुंबईत आज प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले.

मुंबईतील मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. कार्यकर्त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

यावेळी सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आपापल्या जागेवर बसण्याचं आवाहन केलं. परंतु कोणीही मंचावरुन खाली उतरण्यास नकार देत तिथेच ठाण मांडून बसले.

आमच्या सर्वांचे राजीनामा घ्या…

शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा करताच शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांना अश्रू अनावरण झाले त्यांचा हुंदका दाटून आला. त्याच रडलेल्या आवाजात त्यांनी “साहेब निर्णय मागे घ्या. तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा. मीही काही बोलणार नाही. आम्ही सर्व राजीनामे देतो. आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा,” असा आग्रह धरत जयंत पाटील थांबले.

शरद पवार काय म्हणाले?

24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे, असे पवार यांनी म्हंटले.