हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर हल्ला केला आहे. दगडफेक करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घराच्या काचा फोडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली.
अब्दूल सत्तार नेमकं काय म्हणाले-
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना त्यांची जीभ घसरली. . इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीगाळ त्यांनी केली. सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.