हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर दाखवत कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या गाड्या अडवल्या गेल्या. तसेच, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळासाठी परिसरात गोंधळ उडाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि शरद पवार यांचा ताफा पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.
आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या सुरुवातीलाच शरद पवारांनी टिळक स्मारक मंदिरात सर्व तरुणांना मार्गदर्शन केले. शरद पवारांची ही सभा संपल्यानंतर ते निवासस्थानी जाण्यासाठी मंदिरातून बाहेर पडले. मात्र अलका टॉकीज चौकात येताच मराठा आंदोलनकर्त्यांनी शरद पवारांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर ही दाखवले. या घटनेनंतर आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे अशी तीव्र मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप सरकारकडून मराठा आरक्षणा संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. ज्यामुळे मराठा समाज सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करताना दिसत आहे.