फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण???; भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? असा सवाल केला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारवर फी कपातीवरून निशाणा साधला. “कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबत जीआर काढला आहे. पण, त्याबाबतचा अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही हे बिंग फोड,” असा इशारा यावेळी आमदार भातखळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

“कालच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फी कपातीच्या बाबतीत अध्यादेश काढण्या ऐवजी केवळ जीआर काढू हि भूमिका घेऊन मंत्रालयातील शिक्षण सम्राटासमोर गुडघे टेकले. यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणत्या मंत्र्यांनी अध्यादेशाला विरोध केला हे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर करावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू,” असे भातखळकर यांनी सांगितले आहे.