औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात आणखी भर पडली आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव व स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे 4 मे 2022 रोजी पत्र पाठवले आहे. त्या पत्रानुसार देशातील 75 स्मार्ट सिटींची क्रमवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’मध्ये पात्र ठरलेली ही शहरे आहेत. या शहरांना दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी 30 जून 2022 पर्यंत नामांकन दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. हे नामनिर्देशन सादर करताना दहा विविध उपक्रमांसाठी मिळालेल्या बक्षिसांचा तपशील ‘प्रोजेक्ट अवॉर्ड’साठी द्यावा लागणार आहे. ‘इनोव्हेशन अवॉर्ड’साठी दोन संकल्पनांचे सादरीकरण करावे लागणार आहे. त्याशिवाय सिटी अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, लीडरशीप अवॉर्ड आणि पार्टनर्स अवॉर्डसाठी चार संकल्पना द्याव्या लागणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’ मध्ये पात्र ठरलेल्या 75 शहरांपैकी पहिल्या 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातून पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा क्रमांक लागला आहे. पुणे हे शहर 8 व्या स्थानी तर औरंगाबाद 14 व्या स्थानी आले आहे. पहिल्या 15 शहरांत येताना औरंगाबादने कानपूर, कोटा, वेल्लोर, अजमेर, राजकोट, चेन्नई, कोईंबतूर, जयपूर, विशाखापट्टणम्, चंदीगड, अमृतसर, ग्वालेर अशा मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. राज्यपातळीवर पुणे शहराचा पहिला तर औरंगाबादचा दुसरा क्रमांक आला आहे.