बच्चू कडूंना 2 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन प्रकरणी कोर्टाने बच्चू कडू यांना दणका दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता बच्चू कडू उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली होती. त्यावेळी बच्चू कडू आयुक्तांवर धावून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता याप्रकरणी न्यायालयाने अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक आणि शासकीय कामात अडथळा या संदर्भात हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांग बांधवांवर ३-३ वर्ष पैसे खर्च होत नाहीत म्हणून त्यांनी मला फोन केला होता. त्यानंतर मी आयुक्तांना पत्र लिहून सुद्धा त्यावर काहीही उत्तर आम्हाला भेटलं नाही. त्या आयुक्ताने कायद्याची ऐसी का तैसी केली होती. त्यामुळे अखेर आम्हाला नाशिकला यावं लागलं होत. तुम्ही दिव्यांग व्यक्तींचा हक्काचा निधी खर्च करत नाही, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि यामुळे मला शिक्षा सुनावली. यापेक्षा आंदोलन करण्याची वेळ का आली याची चौकशी करायला हवी होती. मात्र त्या आयुक्ताची बढती होते आणि मला शिक्षा सुनावली जातेय असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.