Wednesday, June 7, 2023

“माझं चुकलं…”; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बंडातात्या कराडकरांकडून माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून त्यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. “मी या चारही लोकांची माफी मागत आहे. काल मी जे काही बोललो ते अनावधानाने बोललो. माझा अपमान करण्याचा हेतू नव्हता. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोघींचेही वर्तन तशा प्रकारचे नाही,” असे बंडातात्या कराडकर यांनी म्हंटले.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्याने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की, “माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही. काल मी जे काही बोललो ते अनावधानाने बोललो. माझा अपमान करण्याचा हेतू नव्हता. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोघींचेही वर्तन तशा प्रकारचे नाही. मी जे काही उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासह काही लोकांबाबत बोललो. ते अनावधानाने मी बोललो” असे कराडकर यांनी म्हंटले.

काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

काल सातारा येथे केलेल्या आंदोलनादरम्यान बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचे सांगत काही जणांची नावे देखील घेतली. तसेच पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते ते विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचे नाव सांगा असे आव्हानच त्यांनी दिले.